वर्धा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत सासरे रामदास तडस (Ramdas Tadas) विरूद्ध सुन पूजा तडस (Pooja Tadas) यांच्यात लढत रंगणार आहे. रामदास तडस यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या सुन पूजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या सासरे आणि सूनबाईंच्या लढतीची सगळीकडे चांगलीच चर्चा सुरू आहे. अशातच आता पूजा तडस यांनी रामदास तडस आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
आज (11 एप्रिल) शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नागपुरातील प्रेस क्लबमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत पूजा तडस देखील उपस्थित होत्या. यावेळी पूजा तडस यांनी संपूर्ण तडस कुटुंबियांवर गंभीर आरोप केले.
पूजा तडस म्हणाल्या की, मला मुल झालं होतं त्यावेळी तडस कुटुंबियांकडून बोलण्यात आलं की या बाळाची डीएनए टेस्ट करा, हे बाळ कोणाचं आहे? असं बोलण्यात आलं. त्यावेळी मला रॉडनही मारण्यात आलं. तसंच लग्नानंतर मला एका फ्लॅटवर ठेवण्यात आलं आणि मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आलं. त्याच्यातूनच बाळाचा जन्म झाला, असे आरोप पूजा तडस यांनी केले.
खासदार रामदास तडस म्हणतात, मी मुलाला बेदखल केलं नाही, मुलाला घरातून काढलं नाही. मग मला एकटीलाच का घराबाहेर काढलं? माझ्याशी राजकारण करता? असं पूजा तडस म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या की, मी डीएनए चाचणी करायला तयार आहे. पण, माझी विनंती आहे ती कोर्टाच्या माध्यमातून करा. मला साधं दोन वेळचं अन्न देखील दिलं जात नाही. त्यामुळे मी पंतप्रधान मोदींना विनंती करते की, मला थोडा वेळ द्या आणि मला, माझ्या मुलाला न्याय द्या. तसंच तडस कुटुंबीयांनी मला न्याय दिला नाही म्हणून मी लोकांच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असेही पूजा तडस म्हणाल्या.