उरी सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट एअर स्ट्राईकचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (11 ए्प्रिल) सांगितले की, केंद्रातील भाजप सरकारच्या गेल्या 10 वर्षात “दहशतवादी त्यांच्याच घरात मारले जात आहेत.”
उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सरकारने घेतलेल्या प्रमुख निर्णयांवर प्रकाश टाकला आणि एनडीएच्या राजवटीत जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आले होते यावर भर दिला.
“आज देशात सशक्त सरकार आहे. या ‘मजबूत मोदी सरकारमध्ये दहशतवाद्यांना घरात घुसून मारले जाते’. युद्धक्षेत्रातही भारतीय तिरंगा सुरक्षेची हमी बनला आहे. सात दशकांनंतर जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आला आणि तिहेरी तलाक विरोधात कायदा करण्यात आला. हे आमचे मजबूत सरकार होते ज्याने संसदेत 33 टक्के आरक्षण सुनिश्चित केले आणि सामान्य श्रेणीतील गरीबांनाही 10 टक्के आरक्षण मिळाले,”असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशात जेव्हा-जेव्हा कमकुवत सरकार आले तेव्हा त्याचा फायदा शत्रूंनी घेतला आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. पुढे काँग्रेस पक्षावर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले, “काँग्रेसच्या राजवटीत सैनिकांकडे बुलेटप्रूफ जॅकेटही नव्हती. शत्रूच्या गोळ्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी योग्य व्यवस्था नव्हती. पण भाजपनेच भारतात बनवलेली बुलेटप्रूफ जॅकेट आपल्या सैनिकांना दिली आणि त्यांचे प्राण वाचवले. आज आधुनिक रायफल्सपासून ते लढाऊ विमाने आणि विमानवाहू जहाजांपर्यंत सर्व काही देशातच बनवले जात आहे”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.