रामेश्वरम कॅफे ब्लास्ट प्रकरणात (Rameshwaram Cafe Blast Case) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठी कारवाई केली आहे. आज (12 एप्रिल) NIA ने पश्चिम बंगाल कोलकाता येथून दोघांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये एक या प्रकरणातील मास्टरमाइंड आहे. अब्दुल मतीन ताहा असं मुख्य सुत्रधाराचं नाव आहे.
या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचे नाव मुसावीर हुसैन शाहजीब असे आहे. तर रामेश्वरम कॅफेमध्ये मुसावीर हुसैन शाहजीबने IED स्फोटक ठेवली होती, अशी माहिती NIA कडून स्टेटमेंटमध्ये देण्यात आली आहे.
एनआयएने स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ या पोलीस यंत्रणांच्या उत्तम समन्वयामुळे आरोपींना शोधून काढण्यात यश आलं आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी आपली खोटी ओळख दाखवून कोलकाता येथे राहत होते, तर आज पहाटे त्यांना एनआयएने ताब्यात घेतलं आहे.
NIA ने बंगळुरू रामेश्वरम कॅफे ब्लास्ट प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यांसाठी 10 लाख रूपयांचं बक्षीस ठेवलं होतं. तसंच आरोपींची माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवणार असल्याचंही एनआयएकडून सांगण्यात आलं होतं.