Firing Outside Home Of Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर आज सकाळी दोन अज्ञातांनी गोळीबार (Firing) केला. तर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. या फुटेजमध्ये दोन अज्ञात लोक मोटारसायकलवर आले आणि त्यांनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला आणि नंतर तेथून पळ काढला. या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घराभोवती सुरक्षा वाढवली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये फॉरेन्सिक सायन्स तज्ज्ञांची टीमही उपस्थित असून या घटनेचा तपास करत आहे.
अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबारावर मुंबईचे डीसीपी राज तिलक रोशन म्हणाले, आज पहाटे पाचच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर दोन अज्ञात लोकांनी गोळीबार केला. 3 राऊंड गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. तसेच या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान त्याच्या घराच्या बाल्कनीमध्ये जिथे त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी येतो, तिथेच हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्लेखोरांनी झाडलेल्या दोन-तीन गोळ्या भिंतीला लागल्या. तसेच बाल्कनीचे जाळे फाडून एक गोळी थेट सलमान खानच्या घरात घुसली. त्यामुळे आता या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी मार्चमध्ये, सलमान खानला ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली होती, ज्यानंतर मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि अन्य विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120-बी अंतर्गत एफआयआर नोंदवला होता. प्रशांत गुंजाळकर यांनी वांद्रे पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला होता. तर आता या गोळीबारानंतर पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईवर संशय व्यक्त केला जात आहे.