महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला न आल्याने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे.अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेस उमेदवारीची आशा कायम ठेवत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सोमवारी काँग्रेस व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, मंगळवारीही जोरदार शक्तीप्रदर्शनाने त्यांचा पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही समोर येत आहे.
महाविकास आघाडीकडून उबाठा शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, मेरीटच्या जोरावर या जागेवर काँग्रेसने हक्क सांगितला असला तरी मविआच्या संयुक्त बैठकीत उबाठा शिवसेनेलाच ही जागा देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मात्र, यामुळे मात्र काँग्रेसमधली नाराजी वाढली असूनसांगली लोकसभेची जागा शिवसेनेला गेल्याने संतापलेल्या विशाल पाटील यांनी अखेर बंडखोरीचा निर्णय घेतला. सोमवारी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्याआधी त्यांनी खरसुंडी या गावी जाऊन कुलदैवत सिद्धनाथाचे दर्शन घेतले.
शिवसेना ठाकरे गटाने येथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील तिसऱ्यांदा लोकसभा लढवत आहेत. विशाल पाटील निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले तर सांगलीत तिरंगी लढत होईल.आणि काँग्रेसची मते जर पाटील यांच्या मागे गेली तर मग ठाकरे गटाच्या उमेदवाराला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच या मतदारसंघातील विजयाचे गणितही मोठ्या प्रमाणावर बदलू शकते असे सांगितले जात आहे. बंडखोरीमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा भाजपच्या उमेदवाराला निश्चितच फायदा मिळणार आहे.
काँग्रेसच्या विशाल पाटील यांना मागच्या लोकसभा निवडणुकीत ३ लाख ४४ हजार मते मिळाली होती. भाजपचे संजयकाका पाटील यांना पाटील यांनी कडवी झुंज दिली होती.
कॉंग्रेस पक्षाला आपण १९ एप्रिल पर्यंतची वेळ दिली असल्याचे सांगत विशाल पाटील म्हणाले की ,”सांगलीत महाविकास आघाडीने मोठी चूक केली. काँग्रेस पक्ष मला AB फॉर्म देईल अशी अपेक्षा आहे. आम्हाला आशा आहे की, पक्ष आमच्या बाजूने निर्णय देईल. मात्र 19 तारखेपर्यंत पक्षाने AB फॉर्म दिला नाही, तर बंडखोरी करणार” असा इशारा त्यांनी दिला आहे.