Ajit Pawar : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार कुटुंबात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. कारण काही दिवसांपूर्वीच शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘मूळ पवार आणि बाहेरचे पवार यांच्यात फरक आहे’ असं वक्तव्य केलं होतं. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. तसंच यावरून अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. त्यानंतर काल शरद पवारांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला असून आपण तसं बोललोच नाही, असं स्पष्ट केलं. मात्र, त्यानंतरही अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
अजित पवार म्हणाले की, या वडीलधाऱ्यांना जर जुना काळ आठवत असेल तर त्यांना म्हणा, जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा. आता तुम्ही नवीन काळ बघा. आता 4 दिवस सासूचे संपले, आता सूनेचे 4 दिवस येऊद्या, असं सांगाना. की फक्त सासू..सासू..सासू करायचं मगं सुनेनं फक्त बघत बसायचं का?
बाहेरची..बाहेरची..बाहेरती असं कुठं असतं का राव? असतं का? आपण त्यांच्याकडे घरची लक्ष्मी म्हणून बघतो. चाळीस वर्षे झाली तरी बाहेरची? किती वर्षे झाल्यावर मग घरची? सांगा आई बहिणींनो, बघा बाबा आता, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना खोचक शब्दांत प्रत्त्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, काल शरद पवार यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर घुमजाव केला. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. कारण मी तसं बोललोच नव्हतो. मला पत्रकाराने विचारलं होतं की, अजित पवार यांनी काही भाषण केलं होतं. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं की, मला जनतेनं निवडून दिलं आहे. त्यांना स्वत:ला निवडून दिलं, ताईला निवडून दिलं, आता सूनेला निवडून द्या. त्यापुढे त्यांनी काही वाक्य वापरलं होतं. त्याबाबत मी फक्त स्पष्टीकरण दिलं होतं. यापेक्षा वेगळा अर्थ काढण्याची गरज नही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं.