इराणने इस्त्राईलमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागल्यानंतर बोलावण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीला संबोधित करताना, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी कोणत्याही प्रदेशाला किंवा जगाला आणखी युद्ध परवडणारे नाही. असा सावधानतेचा इशारा दिला आहे . अलीकडेच इराणने इस्रायलवर ३०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. या काळात इराणने आपल्या हल्ल्यात शाहेद-१३६ आत्मघाती ड्रोन, इमाद बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि पावेह क्रूझ क्षेपणास्त्र यांसारख्या घातक हवाई शस्त्रांचा वापर केला.
मात्र, इस्त्रायल अशा घातक शस्त्रांच्या हल्ल्यांना सहज तोंड देऊ शकत होता. इस्रायलने आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या सहाय्याने इराणने हवेत सोडलेल्या मिसाईलपैकी ९९ टक्के मिसाईल नष्ट केले होते. जाणून घेऊया कोणत्या सुरक्षा यंत्रणेच्या मदतीने इस्रायलने ही कामगिरी केली आहे. इराणच्या हल्ल्यात सहभागी असलेले सर्व 185 शाहेद-136 आत्मघाती ड्रोन इस्रायलच्या आयर्न डोम, सी-डोम आणि ॲरो-3 हायपरसॉनिक पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींद्वारे हवेत पाडण्यात आले. इराणने डागलेल्या ११० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपैकी फक्त ७ क्षेपणास्त्रे इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेच्या हातून निसटली, उर्वरित १०३ क्षेपणास्त्रे इस्रायलने हवेत नष्ट केली.