Pune News : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे (Pune) शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्ह्यांच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. अशातच आता पुण्यातील हडपसर परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार झाला आहे. एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपी आणि फिर्यादी दोघेही माजी सैनिक आहे. या दोघांचा सिक्युरिटी ठेकेदारीचा व्यवसाय आहे. तर आज सकाळी शेवाळवाडी येथील संपन्न होम सोसायटी समोर दोन ठेकेदारांमध्ये सिक्युरिटी कामगारांवरून वाद झाला होता. त्यानंतर आरोपी सुधीर शेंडगे आपल्या घरी जाऊन पिस्तून घेऊन आला आणि शेवाळवाडीतील संपन्न होम्स सोसायटी समोर दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये एक गोळी जयवंत खलाटे यांच्या पायाला लागली आणि दुसरी जमिनीवर लागली. या हल्ल्यात खलाटे जखमी झाले आहेत.
सध्या खलाटे यांना उपचारासाठी आर्मी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये माजी सैनिक आणि त्यांच्या मुलाचा समावेश आहे. सुधीर शेंडगे आणि ऋषिकेश शेंडगे अशी आरोपींची नावे आहेत. तर सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.