इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यांमुळे आधीच सुरू असलेल्या गाझा युद्धात आणखी भर पडली आहे. मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. हल्ल्यानंतर इस्रायलने इराणवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर देणार असल्याचे सांगितले. दरम्यान, दक्षिण लेबनॉनमध्ये हवाई हल्ल्यात दोन कमांडरसह तीन हिजबुल्लाह लढवय्ये ठार झाल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे की, रडवान फोर्सच्या वेस्टर्न सेक्टरमधील रॉकेट आणि मिसाईल युनिटचा कमांडर मोहम्मद हुसेन शाहौरी हवाई हल्ल्यात ठार झाला आहे.
सीएनएनच्या वृत्तानुसार, याआधी इस्रायली संरक्षण दलाने दक्षिण लेबनॉनमधील हवाई हल्ल्यात लेबनॉनमधील ऐन अबेल भागात हिजबुल्लाच्या तटीय क्षेत्राचा कमांडर इस्माइल युसेफचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. तर हिजबुल्लाहनेही आपल्या तीन सैनिकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मात्र, हिजबुल्लाकडून याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. इस्रायली संरक्षण दलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहम्मद हुसेन शाहौरीने लेबनॉनच्या मध्य आणि पश्चिम भागातून इस्रायली भागाकडे रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याची योजना आखली होती.
इराणने इस्त्राईलमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागल्यानंतर बोलावण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीला संबोधित करताना, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी कोणत्याही प्रदेशाला किंवा जगाला आणखी युद्ध परवडणारे नाही. असा सावधानतेचा इशारा दिला आहे. “शांततेसाठी काम करण्याची आमची एक सामायिक जबाबदारी आहे. मात्र सध्याची परिस्थिती बघता प्रादेशिक आणि जागतिक शांतता आणि सुरक्षितता तासाला कमी होत आहे. या क्षेत्राला किंवा जगाला आणखी युद्ध परवडणारे नाही,” असे गुटेरेस यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.