Shilpa Shetty-Raj Kundra : बॉलिवूडमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) अडचणीत सापडले आहेत. कारण त्या दोघांवर ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची 97 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
आज (18 एप्रिल) सकाळी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात राज कुंद्रा याच्यावर कारवाई केली आहे. यामध्ये ईडीकडून शिल्पा आणि राज कुंद्रा यांचा बंगला आणि ईक्विटी शेअर जप्त करण्यात आले आहेत. शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेला जुहू येथील फ्लॅट, पुण्यातील बंगला ईडीकडून जप्त करण्यात आला आहे.
लोकांना गुंतवणूक करण्याच्या बदल्यात 10 टक्के परतावा दर महिन्याला देण्याचे अमिष दाखवून मोठी बिटकॉइन घोटाळा केल्याचा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला आहे. तसेच बिटकॉइन प्रकरणात राज कुंद्रा सध्या 150 कोटींच्या फायद्यात असल्याचंही ईडीने म्हटलं आहे.
यापूर्वीच बिटकॉईन घोटाळा प्रकरणात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचं नाव आलं होतं. हा घोटाळा जवळपास दोन हजार कोटींचा असून या प्रकरणी 2018 मध्ये शिल्पा आणि राज कुंद्रांला ईडीने समन्स बजावलं होतं. त्यावेळी त्यांची चौकशी देखील झाली होती. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाजला तेव्हा अटक करण्यात आली होती.