लोकसभा निवडणुकीसाठी उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. महाराष्ट्रात ५ जागांवर मतदान होणार आहे. तसेच देशातील इतर अनेक लोकसभा मतदार संघामध्ये देखील मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी, २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ लोकसभा मतदारसंघ आणि अरुणाचल आणि सिक्कीमच्या ९२ विधानसभा मतदारसंघांचा प्रचार बुधवारी संध्याकाळी संपला. या सर्व लोकसभा आणि विधानसभेच्या जागांसाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आठ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद होणार असून निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. मात्र, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश विधानसभेचे निकाल २ जूनलाच जाहीर होतील. पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेशच्या सर्व दोन, आसामच्या १४, बिहारच्या चार, छत्तीसगडच्या ११, मध्य प्रदेशच्या ६ जागा, महाराष्ट्राच्या पाच जागा, मणिपूरच्या दोन जागा, मेघालयच्या सर्व दोन जागा, मिझोरामच्या एक जागा, सिक्कीममधील एक नागालँडमधील एक, राजस्थानमधील १२, तामिळनाडूमधील सर्व ३९, त्रिपुरातील एक, उत्तर प्रदेशातील आठ, लक्षद्वीपमधील एक, पुद्दुचेरीतील एक, उत्तराखंडमधील पाच, पश्चिम बंगालमधील तीन जागा लोकसभेसाठी पात्र आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांमधून एक आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेवर मतदान होणार आहे.
या टप्प्यात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी नागपुरातून विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन वेळचे खासदार आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे उधमपूरमध्ये हॅट्ट्रिक करण्याचे लक्ष्य ठेवत आहेत. ५२ वर्षीय केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी २००४ पासून तीन वेळा अरुणाचल पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. केंद्रीय मंत्री आणि आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हे आसाममधील दिब्रुगडमधून लोकसभेत परतण्याची आशा व्यक्त करत आहेत.