सध्या इस्त्राईल इराण मध्ये युद्धाचे वातावरण आहे. दोन्ही देशानी एकमेकांवर मिसाईल हल्ले केले आहेत. मात्र हे सुरु असतानाच कोणीतरी इराक देशावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराकचे मोठे नुकसान झाले आहे. अज्ञात विमानाने केलेल्या हल्ल्यात इराकमधील दोन लष्करी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत, तर तीन जण जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. इराकवरील ड्रोन हवाई हल्ल्यात हशद शाबी सैन्याचे दारुगोळा गोदाम आणि टाकी मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.
हा हल्ला अमेरिका आणि इस्रायलने केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, दोन्ही देशांनी या हल्ल्याचा इन्कार केला आहे. अमेरिका आणि इस्रायल या दोघांनीही या हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. मध्यपूर्वेत सातत्याने तणाव वाढत आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायलने इराणवर हल्ला केला होता, ज्याचा बदला म्हणून इराणने इस्रायलवर 300 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती. मात्र, बहुतांश क्षेपणास्त्रे इस्रायलने हवेतच पाडली. यानंतर इस्रायलने पुन्हा कारवाई करत इराणवर हल्ला केला.
दरम्यान इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यांमुळे आधीच सुरू असलेल्या गाझा युद्धात आणखी भर पडली आहे. मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. हल्ल्यानंतर इस्रायलने इराणवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर देणार असल्याचे सांगितले. दरम्यान, दक्षिण लेबनॉनमध्ये हवाई हल्ल्यात दोन कमांडरसह तीन हिजबुल्लाह लढवय्ये ठार झाल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे की, रडवान फोर्सच्या वेस्टर्न सेक्टरमधील रॉकेट आणि मिसाईल युनिटचा कमांडर मोहम्मद हुसेन शाहौरी हवाई हल्ल्यात ठार झाला आहे.