Sharad Pawar : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) हे आज (21 एप्रिल) जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. महाजन हे काय करतात, यावर मी बोलू इच्छित नाही, असं शरद पवार म्हणाले.
विरोधकांचा सुपडा साफ होईल, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं होतं. यावर शरद पवारांना त्यांचं मत विचारलं असताना त्यांनी महाजनांवरती निशाणा साधला. “गिरीश महाजन काय बोलतात आणि काय करतात यावर मी भाष्य करू इच्छित नाही. ते फार अडचणीचं असेल, त्यामुळे मी भाष्य करू इच्छित नाही. मी व्यक्तीगत कुणासंबंधात उत्तर देऊ इच्छित नाही, असं शरद पवार म्हणाले.
पुढे शरद पवारांना एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला का? असा सवाल माध्यमांनी विचारला असता ते म्हणाले की, त्यांचा राजीनामा आला की नाही हे मला माहिती नाही. कारण संघटनेचं काम मी पाहत नाही. त्यावर जयंत पाटील सांगतील, असं शरद पवार म्हणाले.
खडसेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यावरही शरद पवारांनी भाष्य केले. “अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. वैयक्तिक त्रास देण्याचं काम सुरू आहे, असं यापूर्वी होत नव्हतं. कदाचित हाच त्रास खडसेंनाही झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला असेल, असं शरद पवार म्हणाले.