न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय पुरातत्व विभागाकडून मध्यप्रदेशात धार मधल्या भोजशाळेत सुरू असलेल्या वैज्ञानिक सर्वेक्षणाचा सोमवारी आज ३२ वा दिवस आहे. एएसआय अधिकारी व कर्मचारी सकाळीच बँक्वेट हॉलमध्ये दाखल झाले आहेत. आता टीमचे अधिकारी दिवसभर सर्व्हेअंतर्गत अनेक मुद्यांवर काम करणार आहेत. सर्वेक्षण पथकात काही नवीन तज्ज्ञ सामील झाले आहेत, त्यामुळे सर्वेक्षणाच्या कामाला गती मिळणार आहे.
आज केलेल्या पाहणीदरम्यान, भोजशाळेच्या आतील आवारातील फरशीवरील शिलालेखांसह कमाल मौलाना मशिदीच्या खांबांवर आणि भिंतीवरील आकृत्यांची कार्बन डेटिंगद्वारे तपासणी चालू आहे. कालही सदस्यांनी अशाच पद्धतीने काम केले होते. आता शिलालेखांवरील भाषांचा अभ्यास केला जाईल. असे सांगण्यात येत आहे की टीम सदस्य प्रथम हे खांब आणि आकृत्या रसायनांचा वापर करून स्वच्छ करत आहेत. याशिवाय यज्ञकुंडाजवळील एका भागातून माती काढली जात असून, मुख्य हॉलच्या छतावरही काम सुरू आहे.
पुढील सोमवारी, 29 एप्रिल रोजी न्यायालयीन सुनावणी असल्याने टीम सदस्यांची 8 वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यापूर्वी सर्वेक्षणाचा आधार तयार करण्यात येत असून, त्यामुळे कामासाठी मुदतवाढ देण्याची मागणी झाल्यास आतापर्यंत झालेल्या कामाचा लेखाजोखा न्यायालयासमोर मांडता येईल. भोजशाळेच्या बाह्य संकुलाच्या उत्तरेकडील भागात नवीन ठिकाणी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. त्यात दोन ते अडीच फूट खोदकाम करण्यात आले.
आता असे सांगितले जात आहे कि आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणादरम्यान अनेक हिंदू कलाकृती सापडल्या आहेत.