दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या कथित दारू घोटाळ्यातील आरोपी म्हणून ईडी कोठडीत आहेत. त्यांना २१ मार्च रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान त्यानंतर त्यांच्या बाजूने आणि त्यांच्या विरुद्ध अशा अनेक याचिका कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. आज अशीच एक याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. नक्की ती याचिका कोणती आहे ते जाणून घेऊयात.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्व फौजदारी खटल्यांमध्ये असाधारण अंतरिम जामीन देण्याचे निर्देश मागणारी जनहित याचिका फेटाळली. न्यायालयाने याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्याला ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
आदेश पारित करताना, दिल्लीच्या कार्यवाहक मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ म्हणाले, हे न्यायालय उच्च पदावर असलेल्या व्यक्तीविरुद्ध सुरू केलेल्या प्रलंबित फौजदारी खटल्यात असाधारण अंतरिम जामीन देऊ शकत नाही. न्यायालयाच्या न्यायिक आदेशाच्या आधारे कोणीतरी कोठडीत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हे आव्हान सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. ते यासंदर्भात पावले उचलत आहेत. कायदा प्रत्येकासाठी समान आहे.