भारताने गेल्या काही वर्षात संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. अनेक नवीन क्षेपणास्त्रे, पाणबुड्या, युद्धनौका, रणगाडे अशा प्रकारची हत्यारे भारतातच विकसित केली आहेत. त्याच दरम्यान आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताचे मुकुट असलेल्या सियाचीन ग्लेशिअरच्या बेस कॅम्पला भेट दिली. यावेळी त्यांनी या भूमीची ओळख वीरता आणि साहस यासाठी केली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लडाखमधील सियाचीन ग्लेशियरच्या कुमार पोस्टवर तैनात असलेल्या सशस्त्र दलाच्या जवानांशीही त्यांनी संवाद साधला. तसेच त्यांनी तिथे तैनात असलेल्या जवानांना मिठाईचे देखील वाटप केले. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, ‘जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर तुम्ही ज्या प्रकारे देशाच्या रक्षणासाठी सेवा देता त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. सियाचीनची जमीन ही काही सामान्य जमीन नाही. हे देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे.
राजनाथ सिंह यांनी सियाचील बेस कॅम्प येथे युद्ध स्मारकावर वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, ‘सियाचीन आमच्या राष्ट्रीय संकल्पाचे प्रतिनिधित्व करते. आपली राष्ट्रीय राजधानी दिल्ली आहे, मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे आणि आपली तांत्रिक राजधानी बेंगळुरू आहे. सियाचीन ही भारताची शौर्य आणि शौर्याची राजधानी आहे. यावेळी संरक्षणमंत्र्यांसोबत लष्करप्रमुख मनोज पांडेही उपस्थित होते.