*शरण शरण जी हनुमंता | तुज आलों रामदूता ||* *काय भक्तीच्या त्या वाटा | मज दावाव्या सुभटा ||* शूर आणि धीर | स्वामिकाजीं तू सादर || तुका म्हणे रुद्रा | अंजनीचिया कुमरा||
संत तुकाराम महाराजांनी हनुमंताला भक्तीच्या वाटा दाखवण्यासाठी सांगितल्या आहेत. भक्ती ही नवविधा असते. *श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्।* *अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥* नवविधा भक्तीमध्ये कीर्तन हाही भक्तीचा मार्ग संगीतला आहे. परंतु मारुतीरायांनी कीर्तन केव्हा केले? असा आपल्याला प्रश्न पडेल. सीतेच्या शोधार्थ हनुमंत लंकेला गेले, सीतेला शोधले आणि वनारी होऊन स्वतःला बंदि करून घेतले. तेव्हा रावणाच्या समोर हनुमंताने आपल्या भगवंताचे रामाचे किर्तन केले. हे किर्तन अशा पद्धतीने केले की जो बिभीषण रावणाच्या भीतीने सत्कार्याच्या मार्गावर जाण्यास घाबरत होता. त्याने सत्कार्याचा मार्ग स्वीकारला. याचा अर्थ आपली भक्ती अशी असावी की जी समाजातील दुष्कृत्यांमध्येही सत्कार्य ओळखून त्या सत्कार्याला समर्पित होणारी असावी. हे हनुमंताने दाखवून दिले आहे.
समर्थ रामदासांनी 11 मारुती स्तोत्रे लिहिली, परंतु त्यातील ‘भीमरूपी महारुद्रा’ हे स्तोत्र सर्वांना अधिक परिचित आहे. या स्तोत्रामध्ये मारुतीरायांचा उल्लेख समर्थ ‘भीमरूपी’ असा करतात या शब्दाचा अर्थ भयंकर असा होतो, परंतु हा भयंकर शब्द युद्धात दुर्जनांचा नाश करणारा भीमरूपी या अर्थाने योजला आहे. तसेच मारुती स्तोत्र मध्ये ‘धूर्त वैष्णव गायका’ असाही उल्लेख आहे. समर्थांना रामाचा भक्त हा ‘ धूर्त ‘ अपेक्षित आहे.
भक्त हा नेहमी दुबळा, सहनशील, कोणताही त्रास सहन करणारा, भोळा असा अपेक्षित नसून तो धूर्त म्हणजेच हनुमंताप्रमाणे सूज्ञ अपेक्षित आहे. योग्य प्रसंगी योग्य ती कृती करून काही वेळेस जशास तसे उत्तर देणारा अपेक्षित आहे. आपणही हनुमंतासारखे धूर्त बनवण्याचा निश्चित प्रयत्न करावा. मारुती हे असे उदाहरण आहे की, “जो भक्त म्हणून जीवन सुरू करतो आणि भगवंत म्हणून आपल्या जीवनाची कारकीर्द उभारतो…!” असे कार्य करावे की, ज्यामुळे राम आपल्याला बंधू म्हणून स्वीकारेल… हे आपल्याला मारुतीरायांनी त्यांच्या कार्यातून दाखविले आहे.
म्हणून हनुमंताप्रमाणे एक उत्तम भक्त, उत्तम योद्धा, उत्तम कार्यकर्ता बनवून भक्तीच्या वाटेवरून भगवंतापर्यंत जाऊया. भगवंतापर्यंत जाताना जितेंद्रिय, बुद्धिमत्ताम् वरिष्ठम् या त्याच्या गुणांचं निश्चित अनुकरण करूया….
*मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।* *वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।*
अवनी कुलकर्णी, विटा
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत