महाराष्ट्र राज्यात गेले अनेक दिवस वातावरणात बदल पाहायला मिळत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह, गडगडाटसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्याना यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असले तरी काही ठिकाणी कडक उन्हाळा देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यात पावसाचा खेळ सुरु असतांना देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत देखील पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कडाक्याच्या ऊन्हाने त्रस्त झालेल्या दिल्लीकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
मंगळवारी (२३ एप्रिल) संध्याकाळी दिल्ली-एनसीआरमधील लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसाने दिल्ली-एनसीआरचे हवामान बदलले. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली-एनसीआरच्या तापमानात वाढ होत असल्याने लोकांचे हाल होत आहेत. मात्र, आता लोकांना दिलासा मिळाला आहे. येत्या काही तासांत पुन्हा पाऊस पडू शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबई,ठाणे आणि अन्य भागात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियसपर्यंत गेल्याचे दिसून आले. काल वाशीम येथे ४२.२ * सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.या ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील वातावरण सारखे बदलत आहेत. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात सापडला आहे.