आज बुलढाणा खामगाव येथे महायुतीची सभा पार पडली. बुलढाण्यातून महायुतीने प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली आहे. आज खामगाव येथे त्यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि आमदार संजय कुटे, प्रतापराव जाधव आणि महायुतीचे अन्य नेते उपस्थित होते. यावेळी सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.
बुलढाण्यातील खामगाव येथील सभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ५ व्या स्थानी आली. आता ती लवकरच ३ ऱ्या स्थानावर येणार आहे. २०१३ नंतर नरेंद्र मोदींनी एका वर्षात १३ लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चर साठी खर्च केले. त्यामुळे आज देशात रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना, गरिबांना घरे, मेट्रो आणि अन्य विकासकामे मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. खामगाव जालना रेल्वेसाठी उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष एकही पैसे देण्याचे पत्र दिले नाही. उलट त्यांनी आता कोणत्याही नवीन रेल्वेमार्गाकरिता राज्य सरकार एकही पैसे देणार नाही असे पत्र त्यांनी पाठवले. आपले सरकार येताच या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला.” सध्या बुलढाण्यात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीचे नेते नरेंद्र खेडेकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि संदीप शेळके हे अपक्ष उभे राहिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे.