अभिनेता विकी कौशलने ‘मसान’, ‘उरी’, ‘साम बहादूर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपली भूमिका उत्तम साकारली आहे. सध्या विकी त्याचा आगामी चित्रपट ‘छावा’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘छावा: द ग्रेट वॉरियर’ या चित्रपटात तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस पडद्यावर येणार आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटातील विकीचा शूटिंग दरम्यानचा फोटो लीक झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘छावा’ चित्रपटाच्या सेटवरील विकीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये विकी मोठ्या दाढी आणि मिशा असलेला दिसत आहे, यामध्ये जटाधारी त्रिपुंड तिलक लावलेला त्याचा एकदम वेगळा लूक बघायला मिळत आहे. यात विकीने फिकट तपकिरी रंगाचा स्लीव्हलेस कुर्ता घातलेला असून मॅचिंग धोतर आणि कमरेला लाल कापड आहे, गळ्यात रुद्राक्षाची जपमाळ आहे. विकीच्या या परफेक्ट लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. .
‘छावा’ चित्रपटातील अभिनेत्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक्स वर एका चाहत्याने याचा फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देत त्याने लिहिले की, ‘कोणत्याही व्यक्तिरेखेसाठी परफेक्ट दिसणे खरोखरच अवघड काम आहे.’ चित्रपटाची कथा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटात विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर रश्मिका मंदाना त्यांच्या पत्नी येसूबाई भोसलेच्या भूमिकेत दिसणार आहे.
रश्मिकाने नुकतेच या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर तिने इंस्टाग्रामवर कॅप्शन देत ‘छावा’च्या टीमला शुभेच्छा दिल्या. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि सहकलाकार विकी यांचेही तिने आभार मानले. दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा बायोपिक ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2023 मध्ये आलेल्या ‘जरा हटके जरा बचके’ या विनोदी चित्रपटानंतर विकी आणि लक्ष्मण उतेकर यांचा हा दुसरा चित्रपट आहे. ‘छावा’ व्यतिरिक्त विकी ‘बॅड न्यूज’ आणि ‘लव्ह अँड वॉर’मध्येही दिसणार आहे. तर रश्मिका ‘पुष्पा 2: द रुल’, ‘रेनबो’ आणि ‘द गर्लफ्रेंड’ या तेलगू चित्रपटांमध्ये दिसणार आहे.