दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याच्या सीबीआयशी संबंधित प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ७ मेपर्यंत वाढ केली आहे. सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी बुधवारी संपत होती, त्यानंतर त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआय प्रकरणात न्यायालयाने सिसोदिया यांना १२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ईडीने 9 मार्च 2023 रोजी या प्रकरणी चौकशीनंतर मनीष सिसोदिया यांना तिहार तुरुंगातून अटक केली होती. सिसोदिया यांना यापूर्वी 26 फेब्रुवारी 2023 रोजी सीबीआयने अटक केली होती. मनीष सिसोदिया यांनी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात दुसरी जामीन याचिका दाखल केली असून, त्यावर ३० एप्रिल रोजी निर्णय होणार आहे.
दरम्यान दिल्ली अबकारी घोटाळ्यातील आरोपी आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना ईडीने सांगितले की, नफ्याचे प्रमाण सात टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे समर्थन करण्यासाठी कोणतीही बैठक किंवा चर्चा झाली नाही. हे धोरण काही घाऊक विक्रेत्यांच्या बाजूने होते. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी जामीन याचिकेवर पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी घेण्याचे आदेश दिले होते.