Brijbhushan Sharan Singh : लोकसभा निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी (26 एप्रिल) मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. याआधी कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी निवडणूक लढवण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
मी प्रबळ दावेदार आहे आणि मी कैसरगंजमधून निवडणूक लढवणार हे 99.9% निश्चित आहे, असं वक्तव्य ब्रिजभूषण शरहण सिंह यांनी केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे उत्तर प्रदेशातील बहुतांश जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, तर कैसरगंजमधील उमेदवार अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. अशा स्थितीत ब्रिजभूषण सिंह यांनी स्वत:ला तगडा उमेदवार म्हटल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
कैसरगंज मतदारसंघाचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, ‘मी सध्या उमेदवार नाही, पण कैसरगंज जागेवर भाजपसमोर कोणतेही आव्हान नाही. गेल्या निवडणुकीत विजयाचे अंतर 2 लाखांपेक्षा जास्त होते. यावेळी कार्यकर्त्यांनी 5 लाखांहून अधिक मतांचा नारा दिला आहे. देवाने असे ठरवले असेल तर मी काय करू शकतो? मी एक मजबूत उमेदवार आहे, त्यामुळे मी निवडणूक लढवण्याची 99.9% शक्यता आहे. 0.1% बद्दल काहीही सांगता येत नाही”, असे ब्रिजभूषण म्हणाले.