आज (26 एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील ८ जागांवर मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात केरळमधून २०, कर्नाटकातून १४, राजस्थानमधून १३, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी आठ, मध्य प्रदेशातून ७, आसाम आणि बिहारमधून प्रत्येकी पाच, बंगाल आणि छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, मणिपूरमधून प्रत्येकी तीन. आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे.
आज होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी मराठीतून ट्विट करत जनतेला मतदान करण्यासाठी प्रेरित केले आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटले आहे की, “लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, आज मतदान होत असलेल्या, मतदारसंघामधील सर्वांना विक्रमी संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो. मतदानाचे प्रमाण वाढल्याने आपली लोकशाही बळकट होते. विशेषतः आपल्या युवा आणि महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे माझे आवाहन आहे. तुमचे मत म्हणजे तुमचा आवाज!”, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1783667504826536052
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपच्या उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे. तिरुवनंतपुरममधून ते काँग्रेसचे शशी थरूर यांच्याशी निवडणूक लढवत आहेत. रामायण मालिकेतील अभिनेने अरुण गोविल, अभिनेत्री हेमा मालिनी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तेजस्वी सूर्या आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस नेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, भूपेश बघेल आणि अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत हेही रिंगणात आहेत. तर महाराष्ट्रात हिंगोली, नांदेड, अकोला, परभणी, अमरावती, यवतमाळ वाशीम, नांदेड, वर्धा या लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.