MI vs DC : आयपीएल 2024 च्या 43 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 10 धावांनी पराभव केला. 258 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 9 गडी गमावून 247 धावाच करू शकला. जेक फ्रेझर-मॅकगर्कचे स्फोटक अर्धशतक आणि मुकेश कुमार आणि रसिक दार यांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना 10 धावांनी जिंकला.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 257/4 धावा केल्या. तर त्याला प्रत्युत्तरात मुंबई संघ 20 षटकात 9 बाद 247 धावाच करू शकला.
दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामीवीर जेक फ्रेझरने 27 चेंडूंत 11 चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 84 धावांची शानदार खेळी केली. त्याच्याशिवाय ट्रिस्टन स्टब्सने 25 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. विंडीजचा खेळाडू शाई होपने 17 चेंडूत पाच शानदार षटकारांच्या जोरावर 41 धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड, पियुष चावला आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
258 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई संघाची सुरुवात खराब झाली जेव्हा दोन्ही सलामीवीर – रोहित शर्मा आणि इशान किशन पाच षटकांत बाद झाले. मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्माने अर्धशतक झळकावून मुंबईच्या विजयाच्या आशा उंचावल्या. त्याने 32 चेंडूत 63 धावांची खेळी केली. कर्णधार हार्दिक पांड्याने 24 चेंडूत 46 आणि टीम डेव्हिडने 17 चेंडूत 37 धावा केल्या. पण मुकेश आणि रसीखच्या घातक गोलंदाजीसमोर सतत विकेट्स पडणे थांबले नाही आणि मुंबईचा सामना 10 धावांनी गमवावा लागला.