PM Narendra Modi : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आत्तापर्यंत मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तर आता मतदानाचा तिसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (28 एप्रिल) कर्नाटकातील बेळगावी येथे प्रचार केला. यावेळी एका सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रहितापासून एवढी दूर झाली आहे की त्यांना देशाचे यश आवडत नाही. काँग्रेसला भारताच्या कामगिरीची लाज वाटत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हुबळी हत्याकांडावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर ताशेरे ओढले. तर काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी चिनम्मा यांचा अपमान केल्याचा आरोपही पंतप्रधानांनी केला आहे.
रॅलीला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, “जेव्हा भारत मजबूत होतो, तेव्हा प्रत्येक भारतीय आनंदी असतो, पण काँग्रेस राष्ट्रहितापासून एवढी दूर गेली आहे की त्यांना देशाच्या यशाची लाज वाटत नाही. त्यांना भारताच्या प्रत्येक यशाची लाज वाटते. ईव्हीएमच्या बहाण्याने काँग्रेसने संपूर्ण जगात भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.”
“काँग्रेसचा युवराज म्हणतात की, भारतातील राजे-महाराजे जुलमी होते. ते गरिबांची जमीन हिसकावत असत. काँग्रेसच्या राजपुत्राने छत्रपती शिवाजी महाराज, राणी चिन्नम्मा यांचा अपमान केला आहे. काँग्रेसचे राजकुमार हे विधान मत बँकेच्या राजकारणासाठी आणि तुष्टीकरणासाठी जाणीवपूर्वक केलेले विधान आहे”, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.
ते पुढे म्हणाले, “काँग्रेसच्या राजपुत्राला राजे-महाराजांचे योगदान आठवत नाही. व्होटबँकेसाठी ते राजे-महाराजांच्या विरोधात बोलतात, पण नवाबांच्या विरोधात एक शब्दही उच्चारण्याची ताकद त्यांच्यात नाही, बादशाह आणि सुलतानांची ही मानसिकता आता देशासमोर आली आहे.”
हुबळीत काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली. याप्रकरणी त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षालाही धारेवर धरले. पीएम मोदी म्हणाले, “हुबळी येथील कॉलेज कॅम्पसमध्ये जे घडले त्यामुळे देशभरात धक्काबुक्की झाली, मुलीचे कुटुंब कारवाईची मागणी करत राहिले, परंतु काँग्रेस सरकार तुष्टीकरणाच्या दबावाला प्राधान्य देते.”
काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्यासाठी नेहासारख्या मुलींच्या जीवाची किंमत नाही, त्यांना त्यांच्या व्होटबँकेची चिंता आहे. बेंगळुरूमध्ये कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला तेव्हाही त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही, गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असावा, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेस देशातील जनतेच्या डोळ्यात धूळ का फेकत आहे? असा सवालही पंतप्रधानांनी उपस्थित केला.