Rajanath Singh : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajanath Singh) आज (29 एप्रिल) उत्तर प्रदेशातील लखनौ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजनाथ सिंह शहरात दोन किलोमीटरचा रोड शोही करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित राहणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह लखनौ येथील भाजप कार्यालयात जाणार असून तेथे ते नामांकनासाठी रोड शोमध्ये सहभागी होऊ शकतात. वाटेत ते एका मंदिरालाही भेट देणार आहेत.
लखनऊमध्ये 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात 13 इतर मतदारसंघांसह मतदान होणार आहे. राजनाथ सिंह यांनी 2019 मध्ये समाजवादी पक्षाच्या पूनम शत्रुघ्न सिन्हा यांचा 6.3 लाख मतांनी पराभव केला होता. तर 2014 मध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांचा 2,72,749 मतांनी पराभव केला होता.
लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील मतदानाच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 मतदारसंघांमध्ये 62 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला पार पडले.