Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मोठा धक्का बसला आहे. कारण आता मुख्यमंत्र्यांना पत्नी सुनीता यांची भेट घेता येणार नाही. तिहार तुरुंग प्रशासनाने मुख्यमंत्र्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांची तुरुंगात होणारी भेट रद्द केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (29 एप्रिल) सुनीता केजरीवाल या त्यांचे पती अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी तिहार तुरूंगात जात होत्या. मात्र रविवारी रात्री तुरुंगाकडून आदेश जारी करण्यात आला की, सुनीता उद्या तिहारमध्ये येणार नाही आणि अरविंद केजरीवाल यांना भेटणार नाही.
तुरुंगाच्या नियमानुसार तुरुंगात कैद्याला एकावेळी दोनच लोक भेटू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या आप नेते आतिशी यांना सीएम केजरीवाल यांना भेटण्यासाठी तुरुंगात जावे लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 30 एप्रिल रोजी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात भेट घेणार आहेत. अशा परिस्थितीत तुरुंग प्रशासनाने केजरीवाल यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी रद्द केली आहे.
आतिशी आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भेट घेतल्यानंतरच सुनीता केजरीवाल यांना भेटण्याची परवानगी दिली जाईल, असे तिहार प्रशासनाचे म्हणणे आहे. पुढील दोन दिवस सुनीता केजरीवाल त्यांचे पती अरविंद केजरीवाल यांना भेटू शकणार नसल्याचे या वक्तव्यावरून स्पष्ट होते. आता त्या मंगळवारनंतरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ शकणार आहेत.