मुंबई येथील मानखुर्द परिसरात राहणारी २७ वर्षीय पूनम क्षीरसागर नावाची तरुणी दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती, दरम्यान पूनमची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. निजामुद्दीन अली नावाच्या मुलासोबत ती बेपत्ता झाल्याची माहिती होती. मृत तरुणीचे इतरांबरोबर संबंध असल्याच्या संशयावरून तिचा प्रियकर असलेल्या टॅक्सीचालकाने तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी टॅक्सीचालक निजामुद्दीन अली याला मानखुर्द येथून अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.
दरम्यान अलीने पोलिसांकडे असा खुलासा केला की, पूनम धोका देत असल्याचा संशय होता आणि यावरून दोघांमध्ये वादही होत होता. १८ एप्रिलला कामानंतर तिला जेजे हॉस्पिटलजवळ यायला सांगितलं होतं. तिथून कल्याणजवळील खडवली नदी किनारी तिची गळा आवळून हत्या केली. पूनमचा मृतदेह एका पोत्यात घालून उरणच्या चिरनेर येथे फेकून दिला. टॅक्सी ड्रायव्हर असल्यानं त्या ठिकाणाबद्दल आपल्याला माहिती होती असंही अलीने सांगितलं. मूळचा उत्तर प्रदेशातील लखनऊचा असलेला अली विवाहित आहे. त्याला दोन वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. तर पीडित पूनम क्षीरसागर ही अविवाहित होती. ती आई आणि भाऊ यांच्यासोबत राहत होती.
पूनम क्षीरसागर ही दहा दिवसांपूर्वी प्रियकर निजामसोबत बेपत्ता झाली होती. त्यानंतर नुकतेच गुरुवारी (२५ एप्रिल) सकाळी उरणमधील चिरनेर ते खारपाडा रोडलगत दोन दिवसांपूर्वी पूनमचा मृतदेह कुजलेल्या आणि छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. तिच्या आई आणि भावाने मृतदेह ओळखला. तिच्या केसांना असलेली क्लीप, दोन बोटांमधली अंगठी आणि कपड्यांसोबत एक बांगडी यावरून तिची ओळख पटवण्यात आली. डाव्या हातावर एस तर दुसऱ्या हातावर सूरज असा टॅटू होता.
पोलिसांनी सांगितले की, ओळख पटल्यानंतर आम्ही चौकशी सुरू केली. तेव्हा तरुणी चार वर्षांपासून नागपाडा येथील एका टॅक्सी चालकासोबत तिचे संबंध होते असं समोर आलं. याबाबत कुटुंबियांना माहिती नव्हती. पोलिसांनी २८ वर्षीय निजामुद्दीन अलीला मानखुर्दमधून अटक केली. त्याने चौकशीत आपला गुन्हा मान्य केला आहे. सँडहर्स्ट रोडवर घरकाम करणारी पूनम १८ एप्रिलला कामासाठी घरातून निघाली पण ती परतलीच नव्हती. तिच्या कुटुंबियांनी पूनम बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान सदर हत्या लव्ह जिहाद असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच या निर्घृण हत्येनंतर स्थानिक हिंदू समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच दोषीला कठोर शिक्षा होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. माध्यमांशी संवाद साधताना लोढा म्हणाले, मुंबईतील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.असे त्यांनी म्हटले आहे. .