Covishield : ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca ने पहिल्यांदाच कबूल केले आहे की, त्यांच्या कोविड-19 लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यांच्या COVID-19 लसीमध्ये थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) नावाचा दुर्मिळ दुष्परिणाम होण्याची क्षमता आहे, असे कंपनीने कबूल केले आहे. जेव्हा संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात होते त्यावेळी AstraZeneca लस दिली जात होती. ही लस भारतातील आदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केली आहे.
आता AstraZeneca ने कबूल केले आहे की त्यांची कोरोना लस जी Covishield आणि Vaxjavria या नावाने जगभरात विकली जात होती तिच्यामुळे रक्ताच्या गुठळ्यांसह लोकांना दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि कमी प्लेटलेट्स असा समस्या निर्माण होऊ शकतात.
गेल्या वर्षी जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे ॲस्ट्राझेनेकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. स्कॉटच्या म्हणण्यानुसार, एप्रिल 2021 मध्ये लस मिळाल्यानंतर त्याच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी तयार झाली आणि रक्तस्त्राव सुरू झाला, ज्यामुळे मेंदूला कायमची दुखापत झाली आणि तो काम करू शकला नाही. मे 2023 मध्ये, कंपनीने सांगितले की TTS कोणत्याही सामान्य स्तरावर लस-प्रेरित आहे हे त्यांना मान्य नाही.
आता, द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, न्यायालयात सादर केलेल्या कायदेशीर दस्तऐवजात, ॲस्ट्राझेनेका फार्मास्युटिकल कंपनीने म्हटले आहे की, लस अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये, टीटीएस होऊ शकते. यामागचे कारण अद्याप कळू शकले नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान, AstraZeneca ने लस प्रदान करण्यासाठी जागतिक स्तरावर सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) सोबत सहकार्य केले होते.