राज्यात आज बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार आहे. सूर्य आग ओकत असून मराठवाडा, मुंबई, ठाण्यात आज उष्णतेचा यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या तीनही विभागांमध्ये कमाल तापमान ४० अंशांपलीकडे नोंदले गेले. महाराष्ट्रातील नागरिकांना एप्रिल अखेर अधिक त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. राज्यात उष्णतेची लाट निर्माण झाली असून बहुतांश ठिकाणी पारा 40 अंशांच्या पार गेला आहे. 29 एप्रिल रोजी सोलापुरात उच्चांकी 43.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले .
गेल्या आठवडाभरापासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक भागात उन्हाचे चटके जाणवत आहेत . त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच घामाघूम होत आहे. उकाड्यामुळे घशाला सारखी कोरड पडत आहे. अशातच राज्यात येत्या तीन ते चार दिवसात उष्णतेची लाट असणार , असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यांतील काही भागात उष्णतेची लाट येणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. असह्य करणारा उन्हाचा चटका उष्माघात ठरू शकतो. त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
सध्या हवामानात मोठे बदल होत असून गुजरातमधून येणारी उष्ण हवा कोकण, उत्तर- मध्य महाराष्ट्रात येत आहे, तसेच कमी पाऊस, कोरडी माती, एल निनोचा प्रभाव, वाऱ्याच्या खंडिततेचा परिणाम यामुळे तापमानात कमालीची उष्णता जाणवत आहे.