भ्रष्टाचारी आणि दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लातूरमध्ये सांगितले आहे . काँग्रेसच्या राजवटीत वृत्तपत्रांमध्ये भ्रष्टाचार आणि दहशतवादाच्या बातम्या येत असत, तर आता वृत्तपत्रांतून भ्रष्टाचारी पकडल्याच्या बातम्या येतात. ते म्हणाले की, आता भारतात घरात घुसून मारण्याची ताकद आहे, त्यामुळे भारतीय सीमेकडे पाहण्याची कोणाची हिंमत नाही.
लातूरमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ आयोजित प्रचार सभेत आज पंतप्रधान मोदी बोलत होते. “2014 पूर्वीचे दिवस आठवा अनेक ठिकाणी अनोळखी वस्तूंना हात लावू नका असे लिहिले होते, कारण सर्वत्र बॉम्बस्फोट होत होते, पण आज भारतीय सीमेकडे पाहण्याची हिम्मत कोणाची नाही. कारण आज वेळ पडलीच तर भारत शत्रूच्या घरात घुसून हत्या करतो”.
पीएम मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या काळात वृत्तपत्रांमध्ये रोज नवीन भ्रष्टाचाराच्या बातम्या येत होत्या. आज देशात किती भ्रष्टाचाऱ्यांची घरे जप्त केली आहेत, अशा बातम्या येत आहेत. काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले की, ज्यांनी हा देश लुटला त्यांना ते देशाला परत करावे लागेल.पीएम मोदी म्हणाले की, जे लोक भारताचे तुकडे करतायत तेच देशाला लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने देशाला लुटण्याचा मोठा डाव आखला आहे. काँग्रेस तुमची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करत आहे. मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या कुटुंबांनी आपल्या मुलांसाठी देशात खूप लूट करून संपत्ती जमवली आहे.
पीएम मोदी म्हणाले की, पूर्वीचे जाचक नियम बदलत आहेत. देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे.२०२९ मध्ये भारतात राष्ट्रीय ऑलिम्पिकचे आयोजन करणे हे आपले स्वप्न असल्याचे मोदींनी म्हटले आहे. देशाची राज्यघटना कोणीही बदलू शकत नसून विरोधक अपप्रचार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जनतेने काँग्रेसपासून सावध राहावे, असे मोदी म्हणाले. काँग्रेसने एसटी, ओबीसी वंचितांना पुढे येऊ दिले नाही. मात्र मोदी सरकारच्या दहा वर्षात करोडो नागरिकांचे जीवन बदलले आहे. लातूर गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईने त्रस्त आहे, मात्र काँग्रेसने ती कधीच सोडवली नाही.असेही मोदी यावेळी म्हणाले आहेत.