सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सशक्त लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रिया महत्वाची आहे. निवडणुक प्रक्रियेमध्ये मतदार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मतदारांना निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यासाठी तसेच त्यांना विनासायास मतदान करता यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांच्या मदतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित विविध सोयी सुविधा व “ॲप्स” उपलब्ध करुन दिले आहेत. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार दाखल करण्यासाठी, उमेदवारांची माहिती, मतदार यादी, उमेदवार व मतदारांच्या नावांची पाहणी व दुरुस्ती यांसह निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती घेण्यासाठी तसेच मतदान करणे सोयीचे होण्यासाठी महत्त्वपूर्ण ॲप व पोर्टल तयार केले आहेत. सिव्हिजिल, केवायसी, व्होटर्स हेल्पलाइन, सक्षम असे विविध “ॲप्स व पोर्टल” मतदारांना उपयुक्त ठरत आहेत. मतदारांनीही याचा वापर करुन मतदान प्रक्रियेत सहभागी होवून मतदानाचा टक्का वाढवणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी तयार केलेल्या विविध ॲप्स व पोर्टलबद्दल…
आचारसंहिता उल्लंघनाच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी सी- व्हिजिल ॲप- लोकसभा निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास याची तक्रार भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या ‘सीव्हिजिल सिटीझन ॲप’ द्वारे थेट निवडणूक आयोगाकडे दाखल करणे सोपे झाले आहे. या ॲपद्वारे नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारीवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जाते. तसेच तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.
सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड मोबाईलवर किंवा आयओएस डिव्हाईसवर डाऊनलोड करता येते. आचारसंहिता भंगाच्या किंवा राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहताही या ॲपचा वापर करुन काही मिनिटांतच तक्रार नोंदवता येते. तक्रार नोंदवण्यासाठी या ॲपमध्ये आचारसंहिता उल्लंघनाचा प्रकार निवडून यात घटनेचा तपशील, ठिकाण, वेळ नोंदवावी लागते. यासोबत आचारसंहिता उल्लंघनाच्या घटनेची छायाचित्रे किंवा व्हिडिओ डाऊनलोड करावा लागतो.
सीव्हिजिल ॲप हा जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी संबंधित यंत्रणेशी नागरिकांना जोडतो, त्यामुळे तक्रारीवर आवश्यक ती कार्यवाही जलदगतीने होते तसेच नोंदवलेल्या तक्रारीची माहितीही गोपनीय ठेवली जाते. या सर्व बाबींमुळे निवडणूक आयोगाला आचारसंहिता उल्लंघनाच्या घटनांवर अंकुश ठेवणे शक्य झाले आहे.
केवायसी ॲपद्वारे उमेदवारांची माहिती एका क्लिकवर – लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची संपूर्ण माहिती मतदारांना होण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने “नो युवर कँडिडेट” (केवायसी) या ॲपची निर्मिती केली आहे. या ॲप मुळे लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची माहिती केवळ एका क्लिकवर मिळते.
केवायसी ॲप मध्ये उमेदवाराचे नाव टाईप केल्यानंतर त्या उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केलेले नामनिर्देशनपत्र पाहता येते. यामध्ये त्या उमेदवाराची माहिती, संपत्तीचे विवरण, नोंद असणारे गुन्हे आणि यानुषंगाने इतर सविस्तर माहिती दिसते. यामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची इत्तंभूत माहिती मिळणे सोयीचे झाले आहे.
व्होटर्स सर्व्हिस पोर्टल- मतदारांना आवश्यक त्या सर्व सेवा देण्याच्या उद्देशाने व्होटर्स सर्व्हिस पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे मतदारांना मतदार यादी पाहता येते. मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी व मतदार ओळखपत्रातील दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो, मतदान केंद्र, मतदारसंघाचा तपशील पाहणे यांसारख्या विविध सेवांचा लाभ या पोर्टलच्या माध्यमातून मतदार घेऊ शकतात.
पोर्टलची वैशिष्ट्ये – या पोर्टलमुळे पारदर्शकता राहण्याबरोबरच मतदारांना एकाच ठिकाणी अनेक दर्जेदार सेवा मिळतात. यामुळे निवडणुकीशी संबंधित माहिती एकत्रित पाहता येते. या पोर्टलद्वारे माहिती शोधण्यासाठी आपले नाव, जन्मतारीख, वय, राज्य, मतदारसंघ यासारखा तपशील भरुन अथवा ईपिक कार्ड क्रमांक भरुन माहिती शोधता येते. मतदार यादीतील आपले नाव शोधता येते, नवीन मतदार म्हणून नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. नोंदींमध्ये सुधारणा करता येते तसेच पत्ता बदलता येतो. मतदार माहिती स्लिप मिळवता येते. मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे नाव व संपर्क क्रमांकही या पोर्टलद्वारे मिळतात. त्याचबरोबर आपला मतदारसंघ, भाग, मतदान केंद्राचा तपशील मिळवता येतो.
दिव्यांग मतदारांसाठी ‘सक्षम’ ॲप – देशातील अधिकाधिक दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा तसेच मतदान केंद्रावर पोहोचून त्यांना मतदान करणे सोपे आणि सोयीचे होण्यासाठी “सक्षम ॲप” तयार करण्यात आला आहे. हा ॲप दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अनुकूल पद्धतीने बनवण्यात आला आहे. गूगल स्टोअरवरुन आणि आयओएस वरुन सक्षम ॲप डाउनलोड करता येतो. या ॲपद्वारे दिव्यांग मतदारांना त्यांचे यादीतील नाव तपासता येते, मतदान केंद्राचे ठिकाण शोधता येते, बूथपर्यंत पोहोचण्यासाठी व्हीलचेअरची मागणीही करता येते. तसेच दिव्यांग व्यक्ती नवीन मतदार म्हणून स्वतःच्या नावाची नोंदही करु शकतात. मतदार ओळखपत्रात दुरुस्तीची विनंती करणे, मतदार कार्ड आधारशी लिंक करणे तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित इतर प्रकारच्या सेवा व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची माहिती या ॲप द्वारे मिळू शकते. याबरोबरच दिव्यांग मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या समस्येबद्दल तक्रार नोंदवण्याची सोय या ॲपवर आहे. तसेच यावर मतदान केंद्रांबद्दल माहिती, मतदान केंद्राचे स्थळ, मतदान केंद्रावर उपलब्ध प्रवेश योग्यता, मतदान अधिकाऱ्यांचां संपर्क तपशील मिळतो.
निवडणुकांशी संबंधित सविस्तर माहिती व लेख या सक्षम ॲपवर उपलब्ध आहेत. लोकसभा निवडणुकीत सक्षम ॲपचा वापर करुन दिव्यांग व्यक्ती निवडणुकांशी संबंधित विविध सेवांचा लाभ घेत आहेत. या ॲपच्या माध्यमातून माहिती व सुविधा गघेवून दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा..
व्होटर्स हेल्पलाइन ॲप – मतदारांना मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी, मतदार नोंदणी करण्यासाठी, मतदार यादीमध्ये मतदारांच्या नावात व छायाचित्रात बदल करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आयोगाच्या वतीने व्होटर्स हेल्पलाइन ॲप तयार करण्यात आला आहे. ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी, उमेदवारांची सविस्तर माहिती शोधण्यासाठी तसेच मतदार स्लिप डाउनलोड करण्यासाठीही या ॲपचा उपयोग होतो.
व्होटर्स सर्विस पोर्टल द्वारे नवीन मतदार नोंदणी, मतदार यादी मध्ये वैयक्तिक माहिती भरणे, मतदार संघ किंवा माहितीचा तपशील बदलणे किंवा हटवण्यासाठी आवश्यक असणारा अर्ज ऑनलाईन भरणे, उमेदवारांचे प्रोफाइल, शपथपत्रे व अन्य माहिती या ॲपद्वारे पाहता येते.
निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असणाऱ्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने विविध ॲप्स व पोर्टल उपलब्ध करुन दिले आहेत. सी-व्हिजील, व्होटर्स सर्विस पोर्टल, व्होटर्स हेल्पलाइन, केवायसी ॲप, सक्षम ॲप अशा ॲप्सचा वापर करुन मतदारांना मतदारसंघ, मतदार यादी, यादी मधील आपले नाव, छायाचित्र, उमेदवारांची सविस्तर माहिती जाणून घेणे सोपे झाले आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पोर्टल व विविध ॲप्सचा वापर करुन मतदारांनी निवडणुकांच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती जाणून घ्यावी. तसेच मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे व लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी हातभार लावावा…
वृषाली पाटील,
माहिती अधिकारी, कोल्हापूर.