Narayan Rane : नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार हे बारा वर्षे केंद्रीय मंत्री आणि दोन वर्षे संरक्षणमंत्री असून देखील ते काहीही करू शकले नाहीत, असं म्हणत नारायण राणेंनी शरद पवारांवर टीका केली. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
यावेळी नारायण राणे म्हणाले की, शरद पवार 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, दोन वर्ष संरक्षण मंत्री आणि बारा वर्ष केंद्रीय मंत्री राहून काही करू शकले नाहीत. आता त्यांचे वय 84 आहे. मी राजकारणी असून मी काही लोकांचा अभ्यास केला आहे. जर शरद पवार आयुष्यात एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर ते 84 वर्षे जगले नसते, असं राणे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, 84 वर्षाच्या वयामध्ये शरद पवार कधी विकास कामासाठी अस्वस्थ झाले नाहीत. आजकाल माणसाला हवामान बदल झाला की 50-55 वर्षात अटॅक येतो आणि माणसे जातात. तसेच 84 वर्षात जग इकडचं तिकडं होतं पण शरद पवारांना काही होत नाही, ते बिनधास्त असतात.
शरद पवार पंतप्रधान मोदींना सांगतात तुमचं सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता जाणार नाही, पण आमचं सरकार जाणार नाही. 400 पेक्षा जास्त खासदार येणार आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, असा विश्वासही नारायण राणेंनी व्यक्त केला.