Rahul Gandhi : काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने राहुल गांधींना रायबरेलीतून तर केएल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे. या दोन्ही जागांवर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 3 मे आहे.
राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. तर अमेठीतून काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा असतील. त्यामुळे अमेठीत स्मृती इराणी यांना किशोरीलाला शर्मा टक्कर देणार आहे.
2019 मध्ये सोनिया गांधी रायबरेलीमधून काँग्रेसच्या उमेदवार होत्या आणि त्यांनी विजय मिळवला होता. तर त्या यावेळी राज्यसभा सदस्य झाल्या आहेत. तसेच आता रायबरेलीमधून राहुल गांधी निवडणूक लढवणार असून त्यांचा सामना भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांच्याशी होणार आहे.
अमेठीबद्दल बोलायचे झाले तर 2019 मध्ये राहुल गांधींचा पराभव केल्यानंतर स्मृती इराणी यावेळीही भाजपच्या उमेदवार आहेत. इराणी यांच्या विरोधात काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तसेच राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही उमेदवार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत या जागेवरून ते संसदेत पोहोचले होते. तर अमेठीत त्यांचा पराभव झाला होता.