Chitra Wagh : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रचार सभा, पत्रकार परिषदांमध्ये सत्ताधारी-विरोधक एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यामध्ये आता काल (2 मे) भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. अशातच आता चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाच्या जाहिरातीतील ज्या अभिनेत्याला पॉर्न स्टार म्हटले आहे तो अभिनेता चांगलाच संतापला आहे. त्याने वाघ यांना प्रत्युत्तर दिलं असून त्यांना थेट इशारा दिला आहे.
काल पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे गटाने नवीन संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार केला आहे. कारण अदुबाळ नाईटलाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट कंपनीच्या उबाठाच्या जाहिरातीमध्ये जे पात्र आहे ते पॉर्नस्टारचं आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.
राज्यामध्ये पॉर्न संस्कृती आणण्याचा प्रयत्न ठाकरे गट करत आहे. ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये जे पात्र आहे ते पॉर्नस्टार आहे. तसेच जाहिरातीतील तो पॉर्नस्टार विचारतो की, महिलांवरील अत्याचार कधी थांबणार? हाच तो पॉर्नस्टार जो लहान वयांच्या मुलींसोबत अश्लील चित्रण करतो. आता तोच बापाची भूमिका करणारा हा व्यक्ती उल्लू अॅपवरती घाणेरडे कृत्य करतानाच्या क्लिप्स आहेत, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. तर वाघ यांनी केलेल्या या आरोपांनंतर ठाकरे गटाच्या ‘वॉर रूकवादी पापा’ जाहिरातीतील अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी हे संतापले असून त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे.
राज नयानी म्हणाले की, चित्रा वाघ या एक सुशिक्षित महिला आहेत. त्यामुळे एखादा कलावंत जेव्हा सिनेमात किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्याला त्या भूमिकेची जशी मागणी असते त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो हे त्यांना माहिती असावे. आज त्यांनी माझ्या एका वेवसिरीजच्या भूमिकेमधील फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केला. पण त्यांच्या या दाव्याची मी निंदा करतो आणि माझ्या अभिनयाला पॉर्न स्टारची उपमा देऊन माझी अब्रू नुकसानी केल्याचा आक्षेप मी त्यांच्यावर घेतो.
चित्रा वाघ यांनी दोन दिवसात माझी जाहीर माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसान केल्याचा दावा कोर्टात दाखल करेन, असा इशारा राज नयानी यांनी दिला आहे. तसेच पुढे ते म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीत मी काम केलं आहे त्यामुळे त्या जाहिरातीमध्ये काम करणारा कलावंत पॉर्न स्टार आहे असा शोध चित्रा वाघ यांनी लावला. तसेच जे फोटो त्यांनी काल पत्रकार परिषदेत दाखवले ते फोटो माझ्या एका वेब सिरीजमधील आहेत आणि ते माझ्या एका भूमिकेचा भाग आहेत. चित्रा वाघ यांनी माझ्या प्रतिमेला मलीन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मला मनस्ताप सहन करावा लागला. फक्त राजकीय स्वार्थासाठी त्यांनी माझी प्रतिमा मलीन केला आहे, असंही राज नयानी म्हणाले.