PM Narendra Modi On Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्यांना आपल्या कुटुंबाला सांभाळता येत नाही ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? असं म्हणत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर टीका केली. ते एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आमच्यासोबत अधिकृत राष्ट्रवादी आहे. जे राष्ट्रवादीमध्ये झालं त्याला शरद पवार हे राजकीय रंग देत आहेत. पण हा कौटुंबिक वाद असून हे घरातलं भांडण आहे. आपल्या मुलीला वारसा द्यायचा की काम करणाऱ्या पुतण्याला द्यायचा हा प्रश्न शदर पवारांसमोर होता. त्यामुळे त्यांच्यात भांडण झालं.
लोकांमध्ये सहानुभूती नसून त्यांच्यामध्ये राग आहे. तसेच जे आपल्या कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? अशी टीका पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केली.
पुढे उद्धव ठाकरेंबाबत पंतप्रधान म्हणाले की, उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. ते आजारी होते त्यावेळी मी त्यांना फोन केला होता. तसेच मी वहिनींना दररोज फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होतो. ऑपरेशनपूर्वी देखील मला त्यांचा फोन आला होता. बाळासाहेबांचे पुत्र म्हणून मी उद्धव ठाकरेंचा मान-सन्मान करणार. तसेच ते कधीही संकटात अडकले तर मी त्यांच्या मदतीसाठी धावणारा पहिला व्यक्ती असेल. ठाकरे माझे शत्रू नाहीत मात्र, एक कुटुंब म्हणून मी त्यांना मदत करेन, राजकीय व्यक्ती म्हणून नाही, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.