Rahul Gandhi : आज (3 मे) काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने राहुल गांधींना उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून तर किशोरीलाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे. तसेच राहुल गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सोनिया गांधी , प्रियांका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते.
राहुल गांधी आणि किशोरीलाल शर्मा यांनी आज अनुक्रमे रायबरेली आणि अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यांतर्गत 20 मे रोजी या दोन जागांवर मतदान होणार असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी राहुल गांधी त्यांची आई सोनिया गांधी, बहीण प्रियंका गांधी वाड्रा आणि मेहुणे रॉबर्ट वाड्रा यांच्यासह अमेठीच्या फुरसातगंज विमानतळावर पोहोचले. यावेळी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे देखील त्यांच्यासोबत होते. तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नेत्यांशिवाय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रायबरेली येथे पोहोचले होते.
राहुल गांधी यावेळीही लोकसभेच्या दोन जागांवरून निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधी 2004 पासून सलग तीन वेळा अमेठी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. तर 2019 च्या निवडणुकीत ते भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले. ते सध्या केरळच्या वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ही जागा जिंकली होती. तर यावेळीही राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. सोबतच आता काँग्रेसने त्यांना रायबरेली लोकसभा मतदारसंघातूनही उमेदवारी दिली आहे.