Narayan Rane : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मी एकदा मातोश्रीमध्ये गेलो होतो, तेव्हा तीन माणसे पैसे मोजत होते, असा गौप्यस्फोट करत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी खोक्यांबद्दल बोलू नये. कारण एकदा मी संध्याकाळी 7.30 वाजता मातोश्रीमध्ये गेलो होतो. त्यावेळी साहेबांच्या केबिनमध्ये 3 माणसे पैसे मोजत होते. तसंच मी हे साहेबांच्या कानावर घातलं होतं. पुढे उमेदवारी देताना त्यांच्याक़डून पैसे घेत होते, असा आरोप करताना नारायण राणे म्हणाले दमबिम द्यायचं तुमचं काम नाही. तुम्ही कोणाला गाडणार? आम्ही कृती करणारी माणसं आहोत, नुसती बोलणारी नाही, असा खोचक टोला राणेंनी ठाकरेंना लगावला.
पुढे राज ठाकरेंचं कौतुक करत आणि उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणे म्हणाले, माझ्या एका फोनवर राज ठाकरे कोकणात आले आहेत. शब्द द्यावा आणि तो पूर्ण करावा त्याला राज ठाकरे म्हणतात. राज ठाकरे हे माणुसकी जोपासणारे नेते आहेत. पण उद्धव ठाकरे हे नवीन शर्ट पाहिला तरी कुठून आणला असेल असं विचारतात. त्यामुळे उद्धव ठाकरे म्हणजे विकृती आहे. हाच दोन ठाकरेंमधील फरक आहे, अशी टीका राणेंनी केली.