जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या (IAF) ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांची शोध मोहीम आज सोमवारी तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. दरम्यान भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध केले असून त्यांच्यावर 20 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
पूंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर झालेला हल्ला लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अबू हमजा याच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांच्या गटाने घडवून आणला होता, असा अंदाज गुप्तचर यंत्रणांनी वर्तवला आहे. एके असॉल्ट रायफल्स व्यतिरिक्त, दहशतवाद्यांनी यूएस-निर्मित एम 4 कार्बाइन्स आणि स्टील बुलेटचा वापर केला, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
शनिवारी संध्याकाळी पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागात हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला तर चार जण जखमी झाले आहेत. आजही रुग्णालयात जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. दहशतवाद्यांनी ताफ्यातील दोन वाहनांपैकी एका वाहनाला लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला होता.
आजही दहशतवाद्यांचा शोध सुरूच आहे. शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी ठिकठिकाणी चौक्या उभारल्या असून प्रत्येक भागात शोधमोहीम सुरू आहे. वृत्त लिहेपर्यंत सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू होती.