झारखंडचे माजी मुख्यमंत्री जमीन घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. दरम्यान १३ तारखेला झारखंडमध्ये मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी जामीन मिळवण्यासाठी हेमंत सोरेन यांनी झारखंड हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र तिथे त्यांना दिलासा मिळाला नाही. हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळल्यानंतर हेमंत सोरेन यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. तसेच या याचिकेतून सुप्रीम कोर्टात लवकर लवकर सुनावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे सध्या अटकेत आहेत. त्यांच्या जामीन याचिकेवर आज ईडीचे विशेष न्यायधीश राजीव रंजन यांच्या समोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूंनी लिखित उत्तर सादर करण्यात आले. आजच्या सुनावणीनंतर कोर्टाने आपला निर्णय सुरक्षितपणे राखून ठेवला आहे. आता या याचिकेवरील निर्णय कोर्ट १० मे रोजी देणार आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्या प्रकरणातील मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. हेमंत सोरेन यांनी २९ डिसेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला होता. ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सोरेन यांना ९ वेळा समन्स धाडले होते. त्यानंतर ईडीने त्यांची तब्बल सहा तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. दरम्यान हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे.