Ajit Pawar : आज लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा तिसरा टप्पा पार पडत आहे. आजच्या या तिसऱ्या टप्प्यात 11 राज्यातील एकूण 93 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 जागांवर आज मतदान पार पडणार आहे. यामध्ये सातार, कोल्हापूर, बारामती, सोलापूर, रायगड, उस्मानाबाद, सांगली, लातूर, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हातकणंगले या जागांवर मतदान पार पडणार आहे. यासोबतच उत्तर प्रदेशात 10, गुजरातमध्ये 25, मध्य प्रदेशातील 9, कर्नाटकातील 14, छत्तीसगडमधील 7, आसाममधील 4, बिहारमधील 5, पश्चिम बंगालमधील 4, गोव्यातील 2 आणि दादर नगर आणि दमण दीव या केंद्रसशासित प्रदेशातील प्रत्येकी एका जागेवर मतदान पार पडणार आहे.
तर आज सकाळी मतदानाला सुरूवात झाली असून अनेक दिग्गज नेते मतदानासाठी केंद्राकडे निघाले आहेत. यामध्ये काही वेळापूर्वीच अजित पवार यांनी आपल्या आई आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदान केलं.
मतदान केल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांना फिल्मी स्टाईलने उत्तर दिलं. दिवार चित्रपटात ‘मेरे पास मां है’ असा शशी कपूरचा डायलॉग आहे. तर याप्रमाणेच अजित पवारांनी उत्तर दिलं. “विरोधक अफवा पसरवतात की, माझी आईसुद्धा माझ्यासोबत नाही. परंतु माझी आई माझ्यासोबत आहे. माझ्या मातोश्री पुण्यातील एका नातेवाईकांच्या लग्नासाठी गेल्या होत्या. पण आज त्या माझ्यासोबत मतदानासाठी आल्या. मला आईचा आशीर्वाद आहे, कारण शेवटी ती माझी आई आहे”, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, यंदा बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार अशी चुरशीची निवडणूक आहे. यामध्ये महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली असून महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरूद्ध भावजय अशी लढत होत आहे. तसेच 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात बारामती लोकसभा निवडणूक दोन्ही पवारांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.