Rajendra Gavit : आज लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा तिसरा टप्पा पार पडत आहे. या तिसऱ्या टप्प्यात 11 राज्यातील एकूण 93 जागांवर मतदान होत आहे. एकिकडे मतदान सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेनेतील बंडाला साथ देणारे खासदार राजेंद्र गावित यांनी शिंदेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे.
राजेंद्र गावित यांनी आज भाजपमध्ये घरवापसी केली आहे. पालघरमधून तिकिट कापल्यामुळे वैतागलेले राजेंद्र गावित यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गावित यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, मागील लोकसभा निवडणूक राजेंद्र गावित यांनी जिंकली होती. त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचा पराभव केला होता. गावित यांना 5 लाख 80 हजार मते मिळाली होती तर जाधव यांना 4 लाख 91 हजार मते पडली होती. तर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर राजेंद्र गावित यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत ते एकनाथ शिंदेंच्या सेनेत दाखल झाले होते.