Sharad Pawar : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कालच (7 मे) लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला. अशातच आता माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देशातील 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील, असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे.
शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या राजकारणात मोठा बदल होणार असल्याचं भाकित केलं आहे. तसंच येत्या काही दिवसांमध्ये देशातील प्रादेशिक पक्ष एकतर काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काँग्रेसमध्ये विलिन होतील, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी ‘द इंडियन एक्सप्रेसला’ दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्षही काँग्रेसमध्ये विलिन होणार का? असा प्रश्न शरद पवारांना मुलाखतीत विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “आमचा पक्ष हा नेहरू आणि गांधी यांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसची आणि आमची विचारसरणी एकच आहे”, असे शरद पवारांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, “आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करायचा की नाही हे आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय काही सांगू शकत नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो आम्ही एकत्रितपणे घेऊ. तसेच असा काही निर्णय झालाच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तो पचवायला खूप अवघड जाईल”, असेही शरद पवार म्हणाले.