Chhatrapati Sambhajinagar And Dharashiv : छत्रपती संभाजीनगर, धाराशीव नामांतराच्या वादावर शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. आज (8 मे) हायकोर्टाने या नामांतराच्या वादावर फैसला दिला आहे. यावेळी हायकोर्टाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिकांनी दिलेलं आव्हान फेटाळलं आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं ऑक्टोबरमध्ये राखून ठेवलेला निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याची मागणी नुकतीच पूर्ण झाली होती. मात्र, सरकारच्या निर्णयाला काही स्थानिकांनी विरोध केला होता आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
तर आता याबाबतचा निर्णय देत हायकोर्टाने स्थानिकांची याचिका फेटाळली आहे. यावेळी हायकोर्टाने स्पष्ट केले की, “शहरांच्या नामांतराबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा महसूल विभागाकरीता असल्यामुळे यामध्ये कोणाचेही नुकसान होणार नाही.” असा निकाल देत हायकोर्टानं स्थानिकांच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत.