Sanju Samson : काल (7 मे) झालेल्या इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या (IPL 2024) 56 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने घरच्या मैदानावर मोठी धावसंख्या करत 20 षटकांत 221 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ केवळ 201 धावा करू शकला आणि 20 धावांनी पराभूत झाला.
सामन्याच्या एका क्षणी राजस्थान रॉयल्स विजयाच्या जवळ पोहोचला होता, मात्र, कर्णधार संजू सॅमसनच्या विकेटने सर्व काही उलटले. सॅमसनच्या झेलवरून मोठा वाद झाला आणि राजस्थानचा कर्णधार संजू अंपायरशी भिडला, ज्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. आता बीसीसीआयने सॅमसनला आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले असून त्याला मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावला आहे.
संजू सॅमसनने 17 व्या षटकात मुकेश कुमारचा एक चेंडू स्किड केला, ज्यामुळे आणखी एक षटकार मारला जाईल असे वाटत होते. मात्र, सीमारेषेवर उभ्या असलेल्या शाई होपने अप्रतिम झेल घेत त्याला बाद केले. त्याने घेतलेला झेल बाऊंड्री दोरीच्या अगदी जवळ होता आणि पंचांनी निर्णयासाठी तो तिसऱ्या पंचांकडे पाठवला. होपने क्लीन कॅच घेतल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. तसेच एका कोनातून असे दिसून आले की होपच्या पायाने दोरीला स्पर्श केला आहे. थर्ड अंपायर मायकेल गॉफ यांनी इतर कोनांकडे जास्त लक्ष न देता तो आऊट दिला. ज्यावरून वाद निर्माण झाला होता.
जेव्हा पंचांनी वादग्रस्त आऊट दिल्यानंतर सॅमसनने पंचांशी जोरदार वाद घातला. बराच वेळ ते मैदानात उभे होते. मात्र, शेवटी त्याला पंचांचा निर्णय मान्य करावा लागला. या वादामुळे आयपीएलने त्याला आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी मानून कठोर कारवाई करत त्याच्यावर मोठा दंड ठोठावला आहे.