Gaurav More : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा मराठी कॉमेडी शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. या शोमधील प्रत्येक कलाकाराने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तर या शोमधून अभिनेता गौरव मोरे हा चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. त्याचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. पण आता गौरवच्या चाहत्यांसाठी धक्का देणारी बातमी आहे. कारण गौरवने चाहत्यांना निराश करणारा एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.
गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून निरोप घेत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबतची एक पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “रसिक प्रेक्षक आपण हया साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं सन्मान दिला त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत. मला सांगताना खूप वाईट वाटतंय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्य जत्रा” मधुन आपला निरोप घेत आहे.”
“माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील! असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे”, असं गौरवने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, गौरवने शेअर केलेल्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर अनेकांनी गौरवला त्याच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. सध्या गौरवची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.