देशभरात दहशतवादी कारवायांच्या तयारीत असलेल्या पाच दहशतवाद्यांना दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयाने शिक्षा सुनावली. या प्रकरणात पुण्यातील एका तरुणीसह वेगवेगळ्या कलमांन्वये दोघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.जहानजेब सामी वाणी, त्याची पत्नी हिना बशीर बेग (दोघे रा. ओखला विहार, जामियानगर), सादिया अन्वर शेख (रा. विश्रांतवाडी, पुणे) नबील एस. खत्री (रा. कोंढवा, पुणे), अब्दुर बसित अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत.
दिल्लीतील विशेष न्यायालयाने आरोपी जहानजेब सामी याला विविध कलमांन्वये दोषी ठरवून २० वर्षांची शिक्षा, त्याची पत्नी हिना बेग हिला सात वर्षांची, सादिया शेखला सात वर्ष, तसेच नबील खत्रीला आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. अब्दुर बसित याला शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, त्याने शिक्षेचा कालावधी न्यायालयीन कैदेत पूर्ण केला आहे. बसितने आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करण्यासाठी सामीला ‘व्हाॅइस ऑफ हिंद’ हे मासिक सुरू करण्यासाठी मदत केली होती. या खटल्यात डाॅ. रहमान विरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, अद्याप त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली नाही.
मार्च २०२० मध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जहानजेब वाणी आणि त्याची पत्नी हिना यांना अटक केली होती. आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार आणि देशविघातक कारवायांमध्ये दोघे सामील असल्याचे उघड झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आरोपी देशातील महत्त्वाच्या शहरात बाॅम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासात मिळाली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सुरू केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये पुण्यातील सादिया अन्वर शेख, नबील एस. खत्री सामील असल्याचे उघडकीस आले होते.