पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतात आम्हाला शिवशाही आणि रामराज्य पाण्याचे आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. नरेंद्र मोदी सरकारने गेल्या १० वर्षात केलेली कामे ही फक्त ट्रेलर आहे. अजून खरा पिक्चर बाकी आहे असे देखील नितीन गडकरी म्हणाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
नितीन गडकरी मावळ येथील सभेत बोलताना म्हणाले, ”प्रत्येकाला घर, प्रत्येक गावात पाणी, लाईट, शाळा, दवाखाना, रस्ता व रोजगार देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आपल्या देशाला दहशतवादापासून मुक्त करायचे आहे. या देशात रामराज्य आणि शिवशाही आणायची आहे, यासाठी नरेंद्र मोदींचे पुन्हा एकदा पंतप्रधान होणे आवश्यक आहे.”
देशभरात एनडीएने अब की बार ४०० पारचा नारा दिला आहे. महायुतीने देखील महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे अनेक स्टार प्रचारक देशभरात प्रचार सभा घेत आहेत. नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस हे उमेदवारांसाठी प्रचार सभा घेताना दिसून येत आहेत.