Mumbai Indians : मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण पाच वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्स संघ आता आयपीएलच्या 17 व्या हंगामातील प्लेऑफमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध सनरायझर्सच्या विजयासह मुंबईचे नाव गुणतालिकेत आणखीनच संपुष्टात आले आहे.
कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ प्रत्येकी 16 गुणांसह IPL 2024 च्या गुणतालिकेत शीर्षस्थानी आहेत. आता सनरायझर्स संघ 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याचाच अर्थ मुंबई इंडियन्सला आता या तिन्ही संघांवर मात करता येणार नाही.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला आतापर्यंत 12 सामने खेळून केवळ 8 गुण मिळवता आले आहेत. साखळी फेरीत मुंबईचे फक्त दोन सामने बाकी आहेत. अशा स्थितीत मुंबईने आपले दोन्ही सामने जिंकले तरी फक्त 12 गुणच मिळवता येतील. अशा स्थितीत इतर संघांच्या गुणांचे समीकरण असे बनते की मुंबई कोणत्याही परिस्थितीत अंतिम चारमध्ये पोहोचू शकणार नाही.
पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स आघाडीवर आहेत. आयपीएलचा 64वा सामना या दोघांमध्ये रंगणार आहे. दोन्ही संघांचे अजून दोन सामने बाकी आहेत. दोघांचे गुणतालिकेत 12-12 गुण आहेत. याचा अर्थ या दोघांपैकी जो हा सामना जिंकेल त्याला 14 गुण मिळतील. त्यामुळे मुंबईला अंतिम चारमध्ये स्थान मिळवणे अशक्य होईल. केवळ दिल्ली आणि लखनौच नाही तर चेन्नई सुपर किंग्जचेही 12 गुण आहेत आणि त्यांना अजून तीन सामने खेळायचे आहेत.