Ajit Pawar On Sharad Pawar : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केल्यानंतर पक्षात फुट पडली आहे. यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता अजित पवार विरूद्ध शरद पवार अशी लढत पाहायला मिळत आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. यामध्ये आता अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला असून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
शिरूरमधील सभेत बोलताना अजित पवारांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. “जर मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण मी फक्त साहेबांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही मला डावललं गेलं, हा कोणता न्याय आहे?” असा सवाल अजित पवारांनी केला आहे.
“आम्ही दिवसरात्र काम केलं आहे, सगळा जिल्हा सांभाळला आहे. तसेच शरद पवार आमचे दैवत आहेत. पण प्रत्येकाचा एक काळ असतो त्यामुळे आपण 80 वर्षांच्या पुढं गेल्यानंतर थांबलं पाहिजे. नवीन लोकांना त्यांनी संधी दिली पाहिजे. मी देखील आता 60 वर्षांच्या पुढे गेलो आहे त्यामुळे मी आता किती दिवस थांबायचं? कधीतरी आम्हाला चान्स आहे की नाही?” असा सवालही अजित पवारांनी विचारला.
पुढे ते म्हणाले, “एखादी गोष्ट मी मनावर घेतली की मी ती करतोच. मी कामाचा माणूस आहे, तसेच बारामती मी कशा पद्धतीने बदलली ते एकदा येऊन बघा. त्यात अनेक लोकं सांगतात की आम्हाला निवडून द्या, आम्ही बारामतीसारखा आपल्या मतदारसंघात विकास करू. मग आम्हीही काहीतरी केलंय ना? की आम्ही तिथे गोट्या खेळलो का? आम्हीही काम केलंय ना. याचाही आपण विचार करणार की नाही” , असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.